Tags

, , , , , , , , ,

भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण

सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहिण
विचाराया गेले नारद म्हणून
बोट श्रीहरिचे कापले ग बाई
बांधायाला चिंधी लवकर देई
सुभद्रा बोलली, “शालु नि पैठणी
फाडुन का देऊ चिंधी तुम्हास मी ?”
पाठची बहिण झाली वैरिण !
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण

द्रौपदी बोलली, “हरिची मी कोण ?
परी मला त्याने मानिली बहीण
काळजाचि चिंधी काढून देईन
एवढे तयाचे माझ्यावरी ऋण
वसने देउन प्रभू राखी माझी लाज
चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज !”
त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण

प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण
जैसि ज्याची भक्ती तैसा नारायण
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम
पटलि पाहिजे अंतरीची खुण
धन्य तोचि भाऊ, धन्य ती बहीण
प्रीती जी करिती जगी लाभाविण
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण

भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन
द्रौपदिसी बंधु शोभे नारायण

~ गीत : प्रल्हाद केशव अत्रे ~
~ संगीत : वसंत देसाई ~
~ स्वर : आशा भोसले ~
~ चित्रपट : श्यामची आई (१९५३) ~

Advertisements